परमात्मा एक मार्गात “ वेळेचे महत्व”.

बाबांनी परमेश्वरी कृपा संपादन केल्यावर सुद्धा त्यांच्या घरची मंडळी हिंदुधर्मात असलेल्या सर्व देवांना मानत होती . त्यांची पूजा करीत होती . सर्व सण साजरे करीत होती . एकादशा , चतुर्थी या दिवशी उपवास करीत होती . श्री . बाळकृष्ण आणि नारायणराव यांच्या घरी अकरा दिवसांचे हवनकार्य सुरू असताना भारतीय संवत पौष महिना सुरू होता . या हवनाच्या काळातच पौष वद्य चतुर्थी आली होती . तो रविवार असून 1946 च्या जानेवारीची वीस तारीख होती . ही चतुर्थी हिंदुमध्ये मोठ्या चतुर्थ्यांमधील एक चतुर्थी मानली जाते . या दिवसाला वैदिकदृष्टया फार महत्त्व आहे असे समजतात . दिवशी बाबांच्या घरातील बाया मंडळींना उपवास होता . हवन संपायला रात्री बराच उशीर होत होता . साधारणतः अकरा वाजत असत . त्यामुळे घरातील पुरूष मंडळींनी बाबांना विनंती केली की , आज बायांना निर्जला उपवास आहे आणि रात्री अकरा वाजता हवन संपते . त्यामुळे त्यांना जेवायला खूप उशीर होईल . त्यामुळे त्यांना रात्री खूप उशिरापर्यंत उपाशी राहावे लागेल . म्हणून आमची अशी विनंती आहे की , अगोदर जेवण करून नंतर हवन करावयास जावे . त्यामुळे स्त्रियांना त्रास होणार नाही . बाबांनी त्यांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि स्वतःच असा विचार केला की , देवाची पूजा नंतरही केली तरी काय फरक पडणार आहे ! परमेश्वराला आवडणारे कार्य करणे हीच खरी परमेश्वराची आराधना , असे मनाशी ठरवून त्यांच्या विनंतीला त्यांनी मान दिला . संध्याकाळी जेवण आटोपल्यावर हवनकार्य करायला ते आपल्या जेष्ठ बंधूकडे गेले . त्यावेळेस हवन सुरू करायला अर्थातच बराच उशीर झाला होता .




हवन आटोपून बाबा घरी आले . बाबांची झोपण्याची एक वेगळीच 16 X 30 ची खोली होती . त्या खोलीत बाबा एकटेच झोपत असत आणि घरची इतर मंडळी दुसऱ्या खोलीत झोपत असत . नेहमीप्रमाणे बाबा मनात काहीही विचार न आणता खोलीचे दार बंद करून झोपले साधारणतः मध्यरात्रीनंतर एक दोनच्या सुमारास बाबा चोर चोर म्हणून जोरजोरात ओरडू लागले . हे ओरडणे ऐकून बाजूच्या खोलीत झोपणाऱ्या मंडळींची झोप उघडली . सर्व पुरूष मंडळी जागी झाली . ती बाबांच्या खोलीकडे धावत आली आणि पाहतात तर खोलीचे दार बंद आहे आणि बाबा झोपेत जोरजोराने ओरडत होते . त्यांनी बाबांना जागे केले आणि विचारले की कुठे चोर आहे ? खोलीला दुसरे दार होते . त्या दाराकडे जाऊन पाहिले तर तेही दार बंद होते . त्यांनी बाबांना विचारले , " तुम्ही चोर चोर का ओरडत आहेत ? " हे ऐकूण बाबांच्या लक्षात आले की , आपण स्वप्नात होतो . आपल्याकडे कोणीही चोर आले नाहीत . त्या अगोदर ते स्वप्नातच बडबडले की , मी माझ्या उजव्या हाताच्या मुठीत चोराला धरून ठेवले आहे . ती मूठ घट्ट धरलेली असून पोटावर आहे . तो पळण्याची धडपड करतो आहे . हे पाहत असनाताच त्यांना घरच्या मंडळींचा आवाज आला आणि ते जागे होऊन उठून बसले . त्यांनी संपूर्ण खोलीच्या चोहीकडे पाहिले . त्यांना त्यांच्या घरची मंडळी उभी असलेली दिसली . याशिवाय त्यांना काहीही दिसले नाही . ते त्यांना सांगू लागले की , माझ्या अंगाशी खूप वानर भिडले होते . मी जिकडे करवट बदलत होतो तिकडे ते माझ्या शरीराने दाबल्या जात होते . त्यांतील एक वानर जो मुख्य वाटत होता तो माझ्या पोटावर बसला होता ते सर्व माझ्या अंगाशी खेळून पळण्याचा तयारीत होते . म्हणून मी त्या मुख्य वानराचा एक पाय उजव्या हाताच्या मुठीत घट्ट पकडला . तो पळण्याची खूप धडपड करीत होता . मला असे वाटले की , हाच बाबा हनुमानजी आहे आणि तो मला सोडून जात आहे . याशिवाय काहीही सांगितले नाही . आणि त्यांना आपल्या खोलीत परत जाण्यास सांगितले . सर्वजण आपआपल्या खोलीत गेल्यावर बाबा शांतपणे झोपले .



दुसऱ्या दिवशी बाबांनी घरच्या सर्व मंडळींना एकत्र जमविले आणि नंतर त्यांना रात्री घडलेल्या घडामोडीबद्दल सविस्तर सांगण्यास सुरुवात केली . काल जेवण झाल्यावर हवनकार्य उशिरा सुरू केले . नेहमीची ठरलेली वेळ टळून गेली होती . त्यामुळे बाबा हनुमानजी नाराज झाले होते . त्यांनी मला स्वप्नात दर्शन दिले . ते आपल्या दारात येऊन तेथेच उभे राहिले . तेव्हा मी माझ्या खोलीत झोपलो होतो . ते म्हणाले , ' मैं तेरे बापका नौकर नही हूँ । मैं समयपर तेरे यहाँ आया हूँ । मैं भूखा प्यासा तेरे द्वार पर हूँ । और तू खाना खा रहा है । ' इतके बोलून ते वानरसेना घेऊन माझ्या अंगाशी आले . आणि त्या वानरसेनेसह माझ्या शरीराशी खेळून ते चालते झाले . तेव्हा मी बाबा हनुमानजींचे पाय धरले व क्षमा मागितली . ते जाण्याची धडपड करीत होते . पण मी त्यांना सोडले नाही . याचा मी संपूर्ण विचार केला असता मला असे वाटते की , परमेश्वर योग्य वेळेस धावून येतो . आपण ठरविलेली वेळ ही त्याचीच वेळ असते . म्हणून संपूर्ण काम वेळेवर करावे . आज जी परिस्थिती उद्भवली त्यामुळे परमेश्वरी कृपेपासून बरेच दूर जावे लागले असते . मी त्यांना क्षमा मागितली व परमेश्वराला जवळ ठेवले आहे . तरी आपण यापुढे याची जाण ठेवावी असा घरातील मंडळींना त्यांनी उपदेश केला . यावरून हे सिद्ध होते की , वेळेचे महत्व किती असते . आपण नेहमी पाहतो की , बाबा सर्व कामे वेळेवर करतात आणि वेळेचे पूर्णपणे बंधन पाळतात . आपणही यापासून वेळेचे बंधन पाळण्याचे व्रत घेऊ या .



Comments