परमात्मा एक मार्गातील "तीन शब्द"

तीन शब्द

             महानत्यागी बाबा जुमदेवजींनी भगवतकृपेची  प्राप्ती केल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी प्रत्येक शनिवारी सायंकाळी निराकार बैठक होत होती . प्रथम कुटुंबातील लोक आणि नंतर जसजसे या मार्गाचे सेवक वाढत गेले तसतसे तेही या बैठकीला उपस्थित राहत असत . या बैठकीत बाबा निराकार अवस्थेत येत असत आणि मार्गदर्शन करीत असत . प्रत्येक वेळेस ते तत्वावर बोलत असत . याच निराकार बैठकीत निराकार अवस्थेत असताना मानवाचे जीवन वर आणण्याकरिता , त्याच्या कुटुंबात आचरणात आणण्याकरिता तीन शब्द दिलेले आहेत .


1 ) सत्य बोलणे 

2 ) मर्यादा पाळणे आणि 

3 ) प्रेमाने वागणे

              ' शब्द ' भगवान आहे . शब्द हेच भूत ( सैतान ) आहे . सेवकांचे शब्द हेच भगवंताचे शब्द आहेत . फोटो देतांना ते सेवकांना सांगत असत की , कुटुंबात व सेवकांत सत्य , मर्यादा व प्रेमाने वागा आणि त्याबद्दल त्यांचेकडून तसेच वचन घेत असत . याबरोबरच वाईटाचा नाश करण्याबद्दल सुद्धा सांगत असत .




 १ . सत्य बोलणे 


                सत्य म्हणजे आत्म्यातून निर्भीडपणे निघालेले शब्द . समोरच्या व्यक्तीच्या मनावर कोणताही परिणाम होवो त्याची तमा न बाळगता निघणारे शब्द . नाहीतर पुढच्या व्यक्तीवर आपल्या शब्दाचा वाईट परिणाम न होता त्याला समाधान देणारे शब्द बोलणे जे वारंवार बोलल्या जातात . ते सत्य शब्द नव्हेत . हे सर्रास खोटे बोलणे आहे . अशा शब्दामुळे मानवाची फसवणूक होते . मानवाच्या मानेवर जरी कुणी सुरी चालवली तरी सत्य बोलले पाहिजे . सत्य कटु असते . पण ते परमेश्वराला प्रिय असते . ' भगवान के घरमें देर है अंधेर नही या म्हणीप्रमाणे सत्यसुद्धा फार उशिरा कळते . या मार्गाची जागृत कृपा सत्य आहे . या मार्गात खोटे बोलणे वर्ज्य आहे . व्यावहारिक नियम काहीही असले तरी सत्यानेच व्यवहार केले पाहिजे . सत्य कार्याची भीती मनात ठेवू नये . कारण त्याच्याकरिता भगवत्कृपा

नेहमी जवळ असते . सत्य परमेश्वर आहे आणि परमेश्वर ' सत्य ' आहे . सत्य बोलल्यामुळे कुटुंबातील लोकांमध्ये मर्यादा असते आणि सर्व व्यवहार प्रेमाने चालतात . 


२ . मर्यादा पाळणे


             बाबा सेवकांना नेहमी मार्गदर्शन करतात की , त्यांनी आपल्या कुटुंबात मर्यादा पाळली पाहिजे . स्त्रियांनी पतीशी नेहमी मर्यादेने बोलले पाहिजे . प्रत्येक मानवाने मर्यादाशील असणे आवश्यक आहे . लहानांनी मोठ्यांशी वागतांना किंवा मोठ्यांनी लहानांशी वागताना एकमेकांविषयी मर्यादा ठेवली पाहिजे . सेवकांनी सेवकांशी वागताना मर्यादेने वागावे . इथे मर्यादा म्हणजे सुशिक्षित , अशिक्षित किंवा गरीब श्रीमंत ही मर्यादा नव्हे . तो भेदभाव आहे . सर्व सेवक परमेश्वराला सारखे आहेत . बाबांनी सर्व पूजा बंद केल्या आहेत आणि एकाच परमेश्वराबद्दल सांगितले आहे . ही खरी मर्यादा आहे . ती पाळली पाहिजे . मर्यादा पाळल्यामुळे घरात , आपआपसांत प्रेम निर्माण होते . त्यामुळे सर्वांना आयुष्यात सुख , समाधान मिळते . एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण होते . त्यामुळे सत्य व्यवहार होतात.


३ . प्रेमाणे वागणे 


सेवकांनी आपल्या कुटुंबात सर्वांबरोबर प्रेमाने वागले पाहिजे . कोणावरही रागावू नये . कुणी चुकले तर त्याला समजावून सागांवे . लहान मुलांना प्रेमाने सांगितले तर त्यांना लवकर कळते पण रागावले तर त्यांचे आत्मबल कमी होते . जेणेकरून तो घाबरतो आणि त्यामुळे मर्यादाभंग होतो . प्रेम हा भगवंताला आवडणारा प्रथम गुण आहे . प्रत्येक मानवाच्या मनात प्रत्येकाविषयी प्रेम असावयास पाहिजे . म्हणून म्हटले आहे , ' ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय ‘




Comments